
दारूसाठ्यासह धारदार कोयतीही जप्त
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरीनगर जवळ कुडाळ पोलिसांनी बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी अवैध दारूसाठ्यासह सुमारे २४ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये १० लाख रुपयांच्या डंपरसह एका धारदार कोयत्याचा समावेश असून याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नदीम शेख फरारी असून शुभम सावंत राहणार वर्दे सह एक संशयित ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २८) रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे येथे पोलिसांचे पथक गस्तीवर होते. यावेळी गोव्याहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद डंपरला (क्रमांक MH 07 C 6737) पोलिसांनी थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने पोलिसांचा इशारा धुडकावून डंपर भरधाव वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला.
यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखून तातडीने या डंपरचा पाठलाग केला आणि पिंगुळी टेंबधुरीनगर येथे त्याला घेराव घालून अडवले. पोलिसांनी डंपरची तपासणी केली असता, त्यात बिगरपरवाना बेकायदेशीरपणे नेण्यात येत असलेला विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. मुद्देमाल अंदाजे १४ लाख २० हजार रुपये असून डंपर (MH 07 C 6737) किंमत १० लाख रुपये, एक धारदार कोयता आढळला आहे.
या प्रकरणी संशयितांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, भारतीय न्याय संहिता (BNS), मोटार वाहन कायदा, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई कुडाळचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने केली. या बेकायदा दारू वाहतुकीचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत, याचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत.













