LIVE UPDATES

ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी मोठी संधी

दरमहा ५ हजार रुपये मानधन; अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 29, 2026 21:18 PM
views 29  views

‘राजर्षी शाहू महाराज मानधन योजना’ 

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना’ अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. साहित्य क्षेत्रातील योगदान तसेच प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात (Performing Art) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र कलाकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील १०० कलाकारांची निवड करण्यात येणार असून निवड झालेल्या कलाकारांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी कलाकारांनी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे गरजेचे असून दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. तसेच कला किंवा साहित्य क्षेत्रातील योगदानाचा कालावधी किमान १५ वर्षांचा असणे आवश्यक आहे.

साहित्य आणि कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ कलाकारांसोबतच विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना विशेष प्राधान्य राहणार आहे.

योजनेच्या पात्रतेनुसार कलाकाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व मार्गांनी मिळून ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच ज्यांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून आहे किंवा सध्या कलेव्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही, असे कलाकार पात्र ठरणार आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे कलाकार या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशमूर्तीकार ही कला शिल्पकला प्रकारात मोडत असल्याने गणेशमूर्तीकार या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. पात्र कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ जुलै २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करताना जन्मतारखेचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास), शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारस पत्र, रेशन कार्ड/सातबारा तसेच संबंधित कला क्षेत्रातील सहभागाचे पुरावे अशी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

योजनेबाबतची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव जयप्रकाश परब यांनी दिली आहे.