
कणकवली : राष्ट्रीय महामार्गालगतच्या नडगीवे धुरीमाटलेवाडी येथील ६ बंद घरे फोडून संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात ३० हून अधिक घरफोडीचे गुन्हे नावावर असलेल्या कुख्यात 'केटीएम नानावत गँग'चा मुख्य म्होरक्या परदुम सिलोन नानावत (वय २९, रा. घोटावडे, मुळशी) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पुण्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
नडगीवे धुरीभाटलेवाडी येथील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले होते. चोरट्यांनी एकाच रात्री ६ घरांचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला होता. या धाडसी घरफोडीत कपाटातील लॉकर तोडून सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे पेंडंट आणि चांदीच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लांबवल्या होत्या. या प्रकरणी नडगीवे गावचे पोलीस पाटील जितेंद्र चंद्रकांत मणयार यांनी तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून एलसीबीच्या पथकाने तात्काळ समांतर तपास करण्यास सुरुवात केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातामध्ये ग्लोव्हज घातलेले ६ संशयित दुचाकीवरून वावरताना दिसून आले होते. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सदर गुन्ह्याची पद्धत कुख्यात 'केटीएम नानावत गँग'ची असल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसेगाव पडवि परिसरात सापळा रचला. अत्यंत शिताफीने मुख्य आरोपी परदुम सिलोन नानावत याला कुसेगाव येथून सोमवार 29 जून रोजी ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला कणकवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल हाडळ, हवालदार विल्सन डिसोजा, आशिष जामदार, जॅक्सन घोनसाल्विस, पोलीस शिपाई ऋषिकेश टोपले व अमर कांडर यांनी ही कारवाई केली.














