
कुडाळ: तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी १० च्या सुमारास वालावल येथील मुहूर्तळी वाडीत दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत स्थानिक रहिवासी सुधाकर राऊळ यांचे घर अत्यंत धोक्यात आले असून, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना आणि मदत न मिळाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर सुरू आहे. आज सकाळी अचानक मुहूर्तळी वाडी येथील सुधाकर राऊळ यांच्या घराजवळील दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दरडीचा दगड घराच्या भिंतीला आदळल्याने घराला मोठा धोका निर्माण झाला आहे. या घरात ४ सदस्य राहत असून, दरड कोसळल्याने संपूर्ण कुटुंब प्रचंड घाबरले आहे.
घटनेची माहिती मिळताच वालावल गावचे तलाठी, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून सद्यस्थितीत पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेची जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी पाहणी केली. नेरूर मतदार संघाच्या महत्वाच्या प्रश्नांबाबत मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती मांडणार म्हणून सांगितले आहे.
दरम्यान, परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच असून दरड आणखी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असले आणि पंचनामा सुरू असला, तरी प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत किंवा या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवेपर्यंत राऊळ कुटुंब भीतीच्या छायेखाली वावरत आहे. प्रशासनाने या कुटुंबाला तातडीने मदत व सुरक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.











