
दोडामार्ग : पावसाळ्यातील हिरवाई, धबधब्याचा खळाळता प्रवाह आणि निसर्गाच्या कुशीत काही निवांत क्षण घालविण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या सहा तरुणांसाठी रविवारचा दिवस आयुष्यभर विसरता न येणारा ठरला. काही तासांचा आनंदाचा प्रवास क्षणार्धात जीवघेण्या संकटात बदलला आणि मुसळधार पावसाने या सहाही युवकांना विर्डी येथील वझरा सकल धबधब्याच्या जंगलात अक्षरशः कैद केले. रात्रभर अंधार, प्रचंड पाऊस, दुथडी भरून वाहणारी नदी आणि मृत्यूच्या सावटाखाली थरारक रात्र काढल्यानंतर सोमवारी पहाटे अग्निशामक दल, पोलिस, वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांतून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
साखळी येथील सारांश संदेश प्रभू, अंगद कामत, अनुश फुलारी, राज मापारी, विरेश पांगम आणि बेंजामिन हे सहा युवक रविवारी दुपारी सुमारे १:३० वा.च्या सुमारास विर्डी येथील निसर्गरम्य वझरा सकल धबधबा पाहण्यासाठी रवाना झाले. ओसंडून वाहणारे ओढे आणि नदी पार करून त्यांनी धबधबा गाठला. फेसाळणाऱ्या पाण्यात त्यांनी मनमुराद आनंद लुटला; मात्र निसर्गाने काही क्षणांतच आपले रौद्ररूप धारण केले. सायंकाळ होताच काळेकुट्ट ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका वाढला की, जी नदी ओलांडून हे युवक धबधब्यावर पोहोचले होते त्या काही मिनिटांतच दुथडी भरून वाहू लागल्या.
परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. मोबाइल नेटवर्क नसल्याने बाहेरील जगाशी संपर्क तुटला. एका बाजूला खवळलेली नदी, दुसऱ्या बाजूला दाट जंगल, अंधार आणि मुसळधार पाऊस, या भयावह परिस्थितीत सहाही युवकांना जंगलातच रात्र काढावी लागली. प्रचंड थंडी, भूक, भीती आणि अनिश्चिततेत त्यांनी मृत्यूच्या छायेखाली रात्र जागून काढली. दुसरीकडे, रात्री उशिरापर्यंत युवक घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता शिगेला पोहोचली. संपर्क होत नसल्याने डिचोली व वाळपई पोलिस, अग्निशामक दल, वन विभाग यांच्याशी तातडीने संपर्क साधण्यात आला.
या घटनेची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही देण्यात आली. साखळीचे दत्ताराम चिमुलकर यांनीही तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून बचावकार्याला वेग दिला. यानंतर गोवा व महाराष्ट्रातील वन विभाग, अग्निशामक दल, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. युवक नदीच्या पलीकडे धबधब्याजवळ अडकून असल्याचे स्पष्ट होताच जीव धोक्यात घालून बचावकार्य सुरू करण्यात आले.
वेगवान पाण्याचा प्रवाह आणिe कठीण भौगोलिक परिस्थितीचा सामना करत अग्निशामक दलाच्या जवानांनी पहाटे सुमारे ४ वा.च्या सुमारास सर्व युवकांना सुरक्षित बाहेर काढले. सकाळी ६ वाजता हे सर्व युवक सुखरूप साखळी येथे परतताच त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वझरा सकल धबधबा पुन्हा ठरला संकटाचा केंद्रबिंदू- विशेष म्हणजे, वझरा सकल धबधब्यावर पर्यटक जंगलात अडकण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही दोन वेळा याच धबधब्यावर आलेले पर्यटक मुसळधार पावसामुळे जंगलात अडकले होते. त्या वेळी दोडामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत पर्यटकांची सुखरूप सुटका केली होती आणि त्यांच्यासाठी देवदूत ठरले होते. याच महिन्यात, १० जून रोजी झालेल्या मुसळधार पावसातही अशाच प्रकारे काही पर्यटक नदीला अचानक आलेल्या पुरामुळे धबधब्याजवळ अडकून पडले होते. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वझरा सकल धबधब्याच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था, पर्यटकांसाठी आवश्यक निर्बंध आणि पावसाळ्यातील प्रवेशाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाळ्यात डोंगर-दऱ्यांतील धबधबे आणि नद्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण करतात. त्यामुळे निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना जीवाशी खेळ होणार नाही, याची काळजी घेणे ही पर्यटकांचीही तितकीच जबाबदारी असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.











