
कुडाळ : कुडाळ शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील दिवाबत्ती (स्ट्रीट लाईट) गणेश चतुर्थीपासून बंद असल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महावितरण कंपनीचे मीटर बंद असल्यामुळे सदर दिवाबत्ती बंद ठेवण्यात आल्याचे समजते. या गंभीर समस्येबाबत शिवसेना शहरप्रमुख कुडाळ अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी महावितरण कंपनीच्या कुडाळ विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.
रात्रीच्या वेळी महामार्गावर पूर्ण अंधार असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गणेश चतुर्थी, नवरात्र आणि दिवाळी या सणांच्या काळात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना व भाविकांना मोठा त्रास झाला आहे. महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रवास करणे असुरक्षित झाले आहे. कुडाळ बाजारपेठ, बस स्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात चोरीच्या घटनांना वाव मिळत आहे. अशा बाबींकडे महावितरणचे लक्ष वेधले आहे,
महामार्गावरील दिवाबत्ती ही अत्यंत आवश्यक सार्वजनिक सेवा असताना केवळ मीटरच्या तांत्रिक कारणास्तव ती महिनोनमहिने बंद ठेवणे म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, असा आरोप करण्यात आला आहे. महामार्गावरील बंद असलेले सर्व स्ट्रीट लाईट मीटर तात्काळ चालू करण्यात यावेत. यापुढे दिवाबत्ती बंद ठेवण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी. या शिवसेनेच्या प्रमुख मागणी आहेत. या निवेदनाची प्रत माहितीसाठी मुख्याधिकारी (नगरपंचायत कुडाळ) आणि तहसीलदार (कुडाळ) यांनाही पाठवण्यात आली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








