LIVE UPDATES

वृद्धेची सोन्याची चैन लुटणारा संशयित डोंबिवलीतून ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण सिंधुदुर्गची कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 02, 2026 10:12 AM
views 221  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड :देवगड तालुक्यातील शिरगाव-साटमवाडी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवली येथून जेरबंद केले. तन्मय राजेंद्र साटम (वय २९, मूळ रा. शेवरे, शिरगाव, ता. देवगड; सध्या रा. दोन टाकी, धर्मा चाळ, गरीबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शिरगाव-साटमवाडी येथे हा प्रकार घडला होता. याप्रकरणी जयश्री सदाशिव बावसकर यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. मानवी कौशल्य, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी डोंबिवलीतील गणेशनगर परिसरात सापळा रचून आरोपी तन्मय साटम याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीविरुद्ध यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या शीळ-डायघर पोलीस ठाण्यात मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यातही तो पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीची पुढील तपासासाठी आवश्यकता असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून २ सप्टेंबर रोजी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी देवगड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे आणि किरण देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.