
कणकवली : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत कणकवली शहरातील मतदार यादीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत शहरातील एकूण १३ हजार ३४१ मतदारांपैकी २ हजार ६४ नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतील मतदारांची संख्या आता ११ हजार २७७ इतकी झाली आहे. ही माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
वगळण्यात आलेल्या नोंदींमध्ये ६४४ मृत मतदार, १,११२ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ९५ दुबार नोंदी, तसेच शोध घेऊनही न सापडलेले अथवा इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या २१३ मतदारांच्या नोंदींचा समावेश आहे.
कणकवली शहरातील केंद्रनिहाय वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. केंद्र क्रमांक २८६ – १५७, २८७ – १४३, २८८ – २१८, २८९ – १९१, २९० – १५९, २९१ – १०५, २९२ – १३४, २९३ – १३७, २९४ – १९७, २९५ – २७६, २९६ – १९६ आणि २९७ – १५१ अशी नोंद आहे.
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
SIR प्रक्रियेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे मतदारांच्या पाहणीसाठी उपलब्ध राहणार आहे. तसेच तहसील कार्यालय, कणकवली आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, कणकवली येथेही मतदार यादीची प्रत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून घ्यावेत. नाव समाविष्ट करणे, चुकीची माहिती दुरुस्त करणे किंवा मतदार यादीतील नोंदींबाबत हरकत असल्यास विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहे.
प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
Voter Helpline App, ECINetचा वापर करण्याचे आवाहन
नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६, तर नाव वगळणे किंवा मतदार यादीतील नोंदींबाबत हरकतींसाठी संबंधित विहित नमुन्यांचा वापर करता येणार आहे. मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी Voter Helpline App तसेच ECINet या माध्यमांचाही उपयोग करता येणार आहे.
दरम्यान, Unmapped असलेल्या काही मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली आहेत. अशा मतदारांची सुनावणी तहसील कार्यालय, कणकवली येथे घेण्यात येणार असून संबंधित मतदारांना नोटीस देऊन सूचना करण्यात येणार आहे.मतदारांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक असल्यास विहित नमुन्यात दावे व हरकती सादर कराव्यात आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार कणकवली तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.












