LIVE UPDATES

Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 01, 2026 19:05 PM
views 151  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपिक पदांची भरती देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत सुरू करण्यात आली असून, गुरुवारी ३ सप्टेंबर  २०२६ रोजी दुपारी १२ वा पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २३.५९ वा पर्यंत राहील.

सदर भरती प्रक्रिया शासनाच्या नव्याने निर्धारित केलेल्या निवड निकषानुसार राबविण्यात येणार असून, एकूण पदांपैकी ७० टक्के पदांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उर्वरित ३० टक्के पदांसाठी जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवारांचा विचार करण्यात येईल.

या परीक्षेसाठी उमेदवारांना ९०० रुपये जीएसटीसहित परीक्षा शुल्क भरणा करावे लागणार असून, परीक्षा शुल्काची रक्कम ऑफलाईन पेमेंट मोडद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील खात्यावर भरणा करावयाची आहे. परीक्षा शुल्काची रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेत कामकाजाच्या वेळेत (कार्यालयीन सुट्टी वगळून) सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत भरणा करता येईल.

सदरची रक्कम एनईएफटी/आयएमपीएस/अकौंट ट्रान्सफर द्वारे भरता येणार असून, ट्रान्झॅक्शन आयडी प्रवेश अर्जात नमूद करून काऊंटर पार्ट / पैसे भरल्याचा ट्रान्झॅक्शनचा फोटो/स्क्रीन शॉट अर्जात अपलोड करणे आवश्यक आहे. उमेदवाराला अर्ज भरताना अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे अनिवार्य असून, प्रस्तुत पदांकरीता केवळ बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणा करणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारीत व संगणकीकृत पद्धतीने टीसीएस (TCS) कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता व इतर माहिती अचूकपणे नमूद करावी.

सदर भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती बँकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरताना काही अडचण आल्यास टीसीएस (TCS) संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक ७९९६१०४१११ वर संपर्क साधावयाचा आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीपूर्वी सादर करावेत असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.