LIVE UPDATES

गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ल्यासाठी प्रत्येकी पाच नव्या बसेस

मिनीबस व सीएनजी युनिटबाबतही सकारात्मक निर्णय : आमदार दीपक केसरकर ऍक्शन मोडवर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 01, 2026 19:37 PM
views 91  views

वेंगुर्ला : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील परिवहन महामंडळाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यातील एसटी महामंडळाच्या विविध समस्या व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत सावंतवाडी एसटी स्थानकाच्या आराखड्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सादरीकरण करण्यात आले. यावेळी आराखड्यात काही आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुधारित आराखडा पुढील चार दिवसांत पुन्हा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर झालेल्या 30 नव्या बसेसपैकी पाच बसेस सावंतवाडी आगाराला प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी १५ बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामध्ये सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांसाठी प्रत्येकी पाच बसेस उपलब्ध होणार आहेत.

सावंतवाडी मतदारसंघातील अनेक गावे दुर्गम व डोंगराळ भागात असून काही ठिकाणी रस्ते अत्यंत अरुंद आहेत. अनेक गावांमध्ये बस वळविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने एसटी वाहतुकीत अडचणी निर्माण होत आहेत. तसेच कमी प्रवासी भारमानामुळे काही बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या समस्येवर मिनीबस हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे आमदार केसरकर यांनी बैठकीत सांगितले.

मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तिन्ही आगारांसाठी लवकरात लवकर मिनीबस उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. ही मागणी तत्त्वतः मान्य करण्यात आली असून, लवकरात लवकर मिनीबस उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याबाबत काल वेंगुर्ला येथे झालेल्या आमसभेत वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई यांनी आमदार केसरकर यांचे लक्ष वेधले होते. 

सध्या वेंगुर्ले आगारातील सीएनजी बसेसना गॅस भरण्यासाठी सुमारे चार किलोमीटर अंतरावरील खासगी सीएनजी पंपावर जावे लागते. वाहतूक कोंडीमुळे बसना सीएनजी भरून परत येण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ लागत असून, ये-जा करण्यासाठी सुमारे आठ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, इंधन आणि मनुष्यबळाचा अपव्यय होतो. यावर भाजपचे कमलेश गावडे व जि.प. सदस्य संजय गावडे यांनी आमसभेत आमदार केसरकर यांचे लक्ष वेधले होते. ही बाब आजच्या बैठकीत आमदार केसरकर यांनी निदर्शनास आणून दिले.

वेंगुर्ले एसटी आगारात सीएनजी युनिट मंजूर असूनही ते अद्याप सुरू झालेले नाही. एमएनजीएलमार्फत मंजूर असलेले हे सीएनजी युनिट तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार केसरकर यांनी केली. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजूर सीएनजी युनिटचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले ते बोरिवली बंद असलेली एसटी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी केली. या मागणीबाबत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच एसटी महामंडळाचे अनेक कर्मचारी सध्या आरटीओ विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याने एसटीच्या मूळ सेवांवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. एसटी महामंडळाकडे आधीच कर्मचारीवर्गाची कमतरता असल्याने आरटीओकडे प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटी महामंडळाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली. यावर लवकरच आरटीओ विभागामध्ये भरती होणार असून, त्यानंतर एसटी महामंडळाचे कर्मचारी पुन्हा त्यांच्या मूळ सेवेत कार्यरत होतील, असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.

ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. बैठकीला माधव कुसेकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ; दिनेश महाजन, महाव्यवस्थापक (बांधकाम); कार्यकारी अभियंता, बांधकाम मुंबई प्रदेश; श्री. घोडे, विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग; आर्किटेक्ट हुजेफर भोल, सुरज शेट्टी तसेच परिवहन विभागाचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.