LIVE UPDATES

मदर क्वीन्स स्कूलमध्ये शिक्षकांसाठी ‘मनमित्र’ कार्यशाळा

मुलांच्या भावनिक आरोग्याबाबत डॉ. रुपेश पाटकर यांचे मार्गदर्शन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 02, 2026 14:18 PM
views 36  views

सावंतवाडी : मुलांच्या भावनिक आरोग्याच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील मदर क्वीन्स स्कूलमध्ये शिक्षकांसाठी ‘मनमित्र’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी विविध प्रात्यक्षिके आणि शिकवण्याच्या पद्धतींच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सुमारे २२ शिक्षकांनी सहभाग घेतला.

तंत्रज्ञानामुळे मुलांसमोरील परिस्थिती आणि आव्हाने सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे मुलांना केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान देणे पुरेसे नसून, समस्या निवारण, निर्णय घेणे, चिकित्सक विचार आणि सृजनशील विचार यांसारखी जीवनकौशल्ये विकसित करण्याची गरज आहे. ही कौशल्ये मुलांना कशी शिकवता येतील, याचे विविध प्रात्यक्षिकांसह डेमोन्स्ट्रेशन डॉ. पाटकर यांनी शिक्षकांना करून दाखवले.

भावनिक गुंते सोडवताना सर्वप्रथम आपल्या समोरील समस्या नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे, हे ओळखणे आवश्यक आहे. ती भावनिक, नातेसंबंधातील, आर्थिक, आरोग्याशी संबंधित किंवा अन्य स्वरूपाची असू शकते. त्यानंतर त्या परिस्थितीत आपण देत असलेला प्रतिसाद ‘हेल्दी’ आहे की ‘अनहेल्दी’, याची जाणीव होणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. पाटकर यांनी स्पष्ट केले.

यासोबतच ‘पेरेंट इगो स्टेट’, ‘अडल्ट इगो स्टेट’ आणि ‘चाईल्ड इगो स्टेट’ यांची संकल्पना समजून घेणे आणि परिस्थितीनुसार आपल्या वर्तनाचा विचार करणे, हे मुलांना शिकवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रत्येक शाळेत किमान दोन शिक्षक असे असावेत, ज्यांच्याकडे विद्यार्थी आपले भावनिक प्रश्न मोकळेपणाने घेऊन जाऊ शकतील, असा महत्त्वपूर्ण मुद्दा कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्या क्षुल्लक समजल्या जाणार नाहीत आणि त्यांच्या प्रश्नांची गोपनीयता राखली जाईल, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत शिक्षकांना मुलांच्या भावनिक गरजा समजून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले.