LIVE UPDATES

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सज्ज

रस्त्यांची स्वच्छता व खड्डे भरण्याचे युद्धपातळीवर आदेश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 02, 2026 12:50 PM
views 35  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्ग: कोकणवासीयांच्या लाडक्या गणेशोत्सवाचे वेध लागले असून, आगामी १४ सप्टेंबर रोजी बाप्पाचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. हा कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा सण असल्याने गणेशभक्तांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद पूर्णपणे सज्ज झाली आहे. यादरम्यान रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे व झाडी साफ करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले असून, या सफाई मोहिमेने जिल्ह्यात आता वेग धरला आहे.

​पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि खराब झालेल्या मार्गांच्या डागडुजीसाठी ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान कोकणात येणाऱ्या चाकरमानी व भाविकांना प्रवासात कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. 

​या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व गणेशभक्त, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, विविध सांस्कृतिक व गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांना या स्वच्छता मोहीम मध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपतानाच जिल्हा स्वच्छ आणि सुंदर राहावा, यासाठी आगामी ८ सप्टेंबर रोजी विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे नम्र आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.