
अखेरच्या वार्षिक सभेत विक्रमी कामगिरीचा गौरव; कर्मचाऱ्यांना २०% बोनस, शेतकरी, महिला व आंबा-काजू उत्पादकांसाठी मोठ्या घोषणा
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळातील अखेरची वार्षिक सर्वसाधारण सभा ही केवळ औपचारिक सभा न ठरता सहकार क्षेत्रातील विकास, विश्वास आणि विक्रमी यशाचा उत्सव ठरली. तब्बल ७,१७६ कोटी रुपयांची व्यवसाय उलाढाल, १४९ कोटी रुपयांचा ढोबळ नफा, ५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि नफ्यात ४२.८६ टक्क्यांची वाढ नोंदवत जिल्हा बँकेने आर्थिक प्रगतीचा नवा उच्चांक गाठला आहे.
या भक्कम आर्थिक कामगिरीच्या जोरावर सभासदांना १३ टक्के लाभांश व ०.५० टक्के इन्सेंटिव्ह मिळून १३.५० टक्के परतावा देण्यास सभेने मंजुरी दिली. तसेच बँकेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के बोनस जाहीर करण्यात आला. या निर्णयांचे सभागृहातून जोरदार स्वागत करण्यात आले.
वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती दिली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने केवळ आर्थिक प्रगतीच साधलेली नाही, तर पारदर्शक, लोकाभिमुख आणि विश्वासार्ह बँकिंग व्यवस्थेमुळे शेतकरी, महिला, उद्योजक, ठेवीदार व कर्जदारांचा विश्वासही संपादन केला आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनासह संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही यशस्वी वाटचाल शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेत अनेक सभासदांनी बँकेच्या विकासाभिमुख धोरणांचे कौतुक करत विद्यमान संचालक मंडळावर विश्वास व्यक्त केला. शेती, महिला बचत गट, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पर्यटन, लघुउद्योग, फळ प्रक्रिया आणि शिक्षण क्षेत्राला दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले.
नाबार्ड व रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा बँकेने राज्य आणि देशपातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, सहकार क्षेत्रातील मानाचा वैकुंठभाई मेहता पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविल्याबद्दल अध्यक्ष मनीष दळवी व संचालक मंडळाचे अभिनंदन करणारा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा- वार्षिक सभेत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले. शेती व उत्पादनक्षम व्यवसायांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कंपोझिशन कर्ज केवळ एक टक्का सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच टीसीएसच्या सहकार्याने सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक, जलद आणि पारदर्शक कर्ज वितरण व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
आंबा-काजू उत्पादकांना व्याज सवलत- आंबा आणि काजू उत्पादकांना गेल्या हंगामातील नुकसानीतून दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जावरील दोन टक्के व्याज सवलत जाहीर करण्यात आली. यामुळे सुमारे १० हजार कर्जदारांच्या खात्यात २ कोटी २० लाख रुपये जमा होणार आहेत. याशिवाय आंबा-काजू बागायतीसाठी ३० ते ४० कोटी रुपयांचे सवलतीच्या व्याजदरातील कर्ज उपलब्ध करून देण्याचाही संकल्प बँकेने व्यक्त केला.
महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक निर्णय- महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्ज मर्यादा पाच लाखांवरून थेट दहा लाख रुपये करण्यात आली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो महिलांना उद्योग व व्यवसायासाठी अधिक आर्थिक बळ मिळणार आहे.
सामाजिक बांधिलकी कायम- आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक जबाबदारी जपत जिल्हा बँकेने यंदाही 'कुपोषणमुक्त सिंधुदुर्ग' अभियानात सहभागी होत कुपोषित बालके दत्तक घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळातील ही अखेरची वार्षिक सर्वसाधारण सभा असली तरी या कार्यकाळात बँकेने गाठलेली आर्थिक उंची, वाढवलेला लोकविश्वास आणि विकासाभिमुख निर्णयांमुळे सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण झाल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली. अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाचे तसेच बँकेच्या मार्गदर्शक म्हणून राणे कुटुंबीयांच्या योगदानाचेही सभागृहात विशेष कौतुक करण्यात आले.
ठळक निर्णय
- व्यवसाय उलाढाल : ₹७,१७६ कोटी
- ढोबळ नफा : ₹१४९ कोटी
- निव्वळ नफा : ₹५० कोटी
- नफ्यात वाढ : ४२.८६%
- सभासदांना लाभांश + इन्सेंटिव्ह : १३.५०%
- कर्मचाऱ्यांना बोनस : २०%
- शेतकऱ्यांसाठी कंपोझिशन कर्ज : ₹५ लाखांपर्यंत
- महिला बचत गट कर्ज मर्यादा : ₹१० लाख
- आंबा-काजू उत्पादकांना व्याज सवलत : २%
- कर्जदारांना परतावा : ₹२.२० कोटी
- आंबा-काजू बागायतीसाठी नव्या कर्ज वितरणाचा संकल्प : ₹३० ते ₹४० कोटी











