LIVE UPDATES

कारिवडे गावचे सुपुत्र शिवराम माळकर १६ वर्षांच्या देशसेवेनंतर सेवानिवृत्त

गावात भव्य रॅली काढून जंगी स्वागत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 01, 2026 20:08 PM
views 78  views

सावंतवाडी : भारतीय सैन्यात सलग १६ वर्षे अथांग व निष्कलंक देशसेवा बजावून १२११ मिडियम रेजिमेंटचे आणि कारिवडे गावचे सुपुत्र हवालदार शिवराम दत्ताराम माळकर हे ३० जून रोजी सन्मानाने सेवानिवृत्त झाले. आपल्या मातृभूमीचे रक्षण करून गावात परतलेल्या या वीर जवानाचे कारिवडे ग्रामस्थ आणि आजी-माजी सैनिकांच्यावतीने भव्य रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले. हवालदार शिवराम माळकर यांनी भारतीय सेनेत बजावलेल्या शौर्यपूर्ण आणि समर्पित सेवेचा कारिवडे गावाला सार्थ अभिमान असून, त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये संपूर्ण गाव देशप्रेमाच्या रंगात रंगून गेले होते. 

'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या दिमाखदार सोहळ्याला कारिवडे गावचे ग्रामस्थ, शिवराम माळकर यांचे रेजिमेंटमधील सहकारी आणि आजी-माजी सैनिक संघटना, कारिवडेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष एक्स सुभेदार आत्माराम साईल, उपाध्यक्ष एक्स सुभेदार दीपक शेट्ये, सचिव सुभेदार तात्या सावंत, खजिनदार सुभेदार राजेश सावंत यांच्यासह सुभेदार अशोक गावडे, सुभेदार दीपक गावडे, नायब सुभेदार जयवंत मोर्ये, नायब सुभेदार धोंडीराम सावंत, नायब सुभेदार उमेश तलावणेकर, सुभेदार लक्ष्मण गवळी, सुभेदार मेजर संजय सावंत, नायब सुभेदार अजित सावंत, हवालदार नागेश गावडे, हवालदार तानाजी मालकर, हवालदार अजित सावंत आणि ऑन-सर्व्हिस कार्यरत असलेले मंथन कांबळी उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप उर्फ बाळू माळकर, शिवराम माळकर मित्रमंडळ आणि कारिवडे गावातील बहुसंख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी माळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. या सोहळ्यात शिवराम माळकर आणि त्यांच्या परिवाराचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. दीर्घकाळ देशाची सेवा करून सुखरूप घरी परतलेल्या आपल्या सुपुत्राचे स्वागत करताना कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे डोळे आनंदाश्रूंनी आणि अभिमानाने भरून आले होते.