
वैभववाडी : तालुक्याला धुवांधार पावसाने झोडपले.वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे उंबर्डे येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले.सुदैवाने जीवीतहानी टळली. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून बुधवारीही तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उंबर्डे येथील अंजली विष्णू रामाणे यांच्या घरावर झाड कोसळले.यात घराचे छप्पर कोसळून नुकसान झाले. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, पावसामुळे घाट मार्गात किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या. मात्र त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही घाटांमधील वाहतूक सुरळीत सुरू होती.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेती कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामांना सुरुवात केली असून ग्रामीण भागात शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे.











