LIVE UPDATES

गावराई सड्यावरील कातळशिल्पे चिरेखाणीच्या भक्ष्यस्थानी

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 16:50 PM
views 60  views

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील गावराई सडा येथे असलेली बहुसंख्य कातळशिल्पे चिरेखाणीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. याठिकाणी २५ ते ३० कातळशिल्पे होती, असे स्थानिक रहिवासी सांगतात. मात्र, आता तेथे हाताच्या बोटावर मोजण्याएवढी कातळशिल्पे उरली आहेत, अशी माहिती कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी दिली.गावराई हे छोटेसे निसर्गसुंदर गाव कसाल मालवण रस्त्यावर सुकळवाडजवळ आहे. गावातील गिरोबा मंदिराकडून एक घाटरस्ता गावाच्या उत्तरेला असलेल्या कातळसड्यावर जातो. या सड्यावर २५ ते ३० कातळशिल्पे होती. मात्र गेल्या काही वर्षात येथे सुरू झालेल्या एका मोठ्या चिरेखाणीत यापैकी बहुतेक कातळशिल्पे नष्ट झाल्याचे नुकत्याच केलेल्या पाहणीत आढळून आले, असे श्री. लळीत यांनी सांगितले. या पाहणीवेळी मिहिर प्रभाकर वाईरकर उपस्थित होते. सद्यस्थितीत फक्त पाचसहा कातळशिल्पे सुरक्षित असून त्यात एक मनुष्याकृती, दोन मासे, चतुष्पाद प्राणी आणि काही भौमितिक आकृत्यांचा समावेश आहे. काही कातळशिल्पांवरून चिरे वाहतुकीच्या डंपर्ससाठी रस्ता तयार झाला आहे. एकीकडे शासन कातळशिल्पांची माहिती सर्वदूर पोचविण्यासाठी करोडो रुपये खर्चाचे माहितीपट तयार करण्याची घोषणा करीत आहे. मात्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांचे सर्वेक्षण, जीपीएस मॅपिंग, संरक्षण या अत्यंत प्राथमिक बाबी ज्या तातडीने होणे गरजेचे आहे, त्याकडे लक्षच दिले जात नाही. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेल्या कुडोपी येथील कातळशिल्पांच्या तीनपैकी एका क्लस्टरमध्ये चिरेखाणीसाठी टोकदार लोखंडी हत्याराने खोदून टेस्टिंग केल्याची घटनाही दिसून आली आहे. याआधी जिल्ह्यातील विर्डी, वडाचा पाट, खोटले येथील अनेक कातळशिल्पे अशाच प्रकारे नष्ट झाली आहेत. 

चिरेखाणींना परवानगी देताना त्या परिसरात कातळशिल्पे नसल्याची खात्री करूनच प्रशासनाने परवानगी द्यावी किंवा किमान त्यांचे संरक्षण करण्याच्या अटीवरच परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. लळीत यांनी केली आहे. चिरेखाण सुरू करण्यापूर्वी त्या भागात ‘पांडवांची चित्रे’ म्हणून सामान्यतः ओळखली जाणारी आणि मानवी वारसा असलेली ही कातळशिल्पे जाणीवपूर्वक जपावीत आणि वारसा संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी चिरेखाण व्यावसायिकांना केले आहे.