
कणकवली : कोकणातील शेतकर्यांसाठी कृषी एआय धोरण राबविण्यात येणार आहे. ही योजना बारामती येथील ॲग्रो एआय इन्सिटट्यूटच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. येत्या आठवड्यातच हे धोरण राबविण्यास सुरुवात करत असून त्यासाठी सर्वप्रथम ४०० शेतकर्यांची निवड करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषेदेस भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जि. प. अध्यक्ष रणजीत देसाई, जि. प. सदस्य मनोज रावराणे, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, पप्पू परब आदी उपस्थित होते.
नीतेश राणे म्हणाले, कृषी एआय धोरण राबविण्यासाठी बारामती येथील ॲग्रो एआय इन्सिटट्यूटशी करार झाला असून यांना अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत. हा प्रयोग असून यासाठी ४०० शेतकर्यांची निवड करण्यात आली आहे. शेतकर्यांना मदत, मार्गदर्शन असे या योजनेचे स्वरुप आहे. ॲग्रो एआय इन्सिटट्यूटने बारामती येथे अनेक बदल घडवून दाखवले आहेत. तसेच बदल कोकणातही घडतील. या प्रयोगाला आम्ही गेल्या आठवड्यातच सुरुवात करणार होतो. पण, सध्या भातशेतीचा हंगाम सुरु असल्याने येत्या आठवड्यात या योजनेला सुरुवात करू. तर हा कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहोचविणार असल्याचेही राणे म्हणाले.











