LIVE UPDATES

कुसूर नळपाणी योजनेचा ठेकेदार निखिल घेवारी ब्लॅकलिस्ट

जिल्हा परिषदेची कारवाई : योजनेतील हलगर्जीपणा ठेकेदाराला पडला महागात
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 25, 2026 19:15 PM
views 43  views

सिंधुदुर्गनगरी : जल जीवन मिशन अंतर्गत वैभववाडी तालुक्यातील कुसुर मधलीवाडी नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीचे काम अपूर्ण राहिल्याने संबंधित कणकवलीतील ठेकेदार निखिल घेवारी यांच्यावर जिल्हा परिषदेने कडक कारवाई करीत तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. कुसूर मधलीवाडी नळपाणी पुरवठा योजनेचे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण न केल्यामुळे त्यांचा मक्ता रद्द करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश खेबुडकर आणि सिंधुदुर्ग ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता यांनी जारी केले आहेत.

सुमारे ३९ लाख ७३ हजार रुपयांच्या कुसूर मधलीवाडी येथील नळपाणी पुरवठा दुरुस्ती काम सुरु करण्याचा आदेश २३ डिसेंबर २०२२ ला देण्यात आला होता. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत करारातील अटींनुसार हे काम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, ३१ मे २०२६ पर्यंत कामाला ठेकेदाराच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली होती, तरीही कामात कोणतीही प्रगती दिसून आली नाही. त्यामुळे ​बी-1 निविदेच्या अटी नुसार 2 शर्तीमधील कामाची प्रगती राखलेली नाही तसेच दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्याने कणकवलीतील ठेकेदार निखिल घेवारी यांच्यावर जल जीवन मिशनच्या नियमांनुसार तीन वर्षांसाठी काळ्या यादीत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.