
कणकवली : महायुती सरकारने शेतकर्यांच्या हितासाठी ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. राज्याच्या इतिहासात अनेक सरकारे आली व त्यांनी शेतकर्यांसाठी महत्वाकांक्षी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. पण, इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकर्यांना दोनवेळा कर्जमाफी जाहीर केली अशी माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी केलेल्या कर्जमाफीची सविस्तर माहिती यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. पत्रकार परिषेदेस भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जि. प. अध्यक्ष रणजीत देसाई, जि. प. सदस्य मनोज रावराणे, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, पप्पू परब आदी उपस्थित होते.
पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले, यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी योजनेच्या माध्यमातून ३८ हजार कोटी तर आता अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून ५६ लाख शेतकर्यांना मिळून ४२ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकर्यांची बाजू घेणारे आमचे विरोधक शेतकर्यांसाठी काहीच करत नाहीत. पण, देवेंद्र फडणवीस हे शेतकर्यांचे पाठीराखे आहेत. इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकर्यांना दोनवेळा कर्जमाफी जाहीर केली असेही पालकमंत्री राणे म्हणाले.
पालकमंत्री राणे म्हणाले, वातावरणातील बदलांमुळे त्रस्त शेतकर्यांना खर्या अर्थाने ताकद महायुती सरकारने दिली. अधिवेशनात महिला शेतकरी भगिनींसाठी ऐतिहासीक बिल आणले गेले. त्या माध्यमातून महिला शेतकर्यांना आधार देण्याचे काम महायुती सरकारने केले. जलयुक्त शिवार, कृषीपंप वीजमाफी तसेचा १२ तास वीज देण्याचा निर्णय अशा अनेक योजना सरकारने राबविल्या. फळपिक विमा योजना, सिंचन योजनाही शेतकर्यांसाठी राबविल्या गेल्या असल्याचे राणे म्हणाले.











