
दोडामार्ग : क्राफ्ट घर आणि सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळ, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ७० हुन अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी मुलांना मंडळाच्या वतीने भेटवस्तु दवण्यात आली.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला योग्य व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि चित्रकलेतील कौशल्याचा सुंदर आविष्कार चित्रांतून सादर केला.
स्पर्धेसाठी आवश्यक चित्रकलेचा कागद आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आला होता. क्राफ्ट घरच्या वतीने सिमंतिनी नाईक हिने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत व प्रोत्साहन केले. या उपक्रमाला भारतीय जनता पक्षाचे चेतन चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.
त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करण्यासोबतच मुलांसाठी भेटवस्तू देऊन या उपक्रमाला मोलाचा हातभार लावला. सिमंतिनी नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मुलांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा पिंपळेश्वर हॉल येथे पार पडली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळ, दोडामार्ग,चेतन चव्हाण, सर्व प्रायोजक, देणगीदार आणि सहकार्यकर्त्यांचे क्राफ्ट घरच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
ताजी बातमी
View all











