
म्हापण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला विज्ञानाची जोड देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कल्पकता, संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन विविध वैज्ञानिक प्रतिकृती व उपकरणे तयार केली असून, त्यामागील वैज्ञानिक तत्त्व समजून घेऊन त्यांची प्रभावी मांडणी करण्याचे आव्हानही विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या पेलले आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांनी केले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ व्या वेंगुर्ला तालुकास्तरीय दोन दिवसीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन २७ व २८ नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी २ वाजता शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सभापती शंकर घारे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सदस्या शीतल राऊत, गटशिक्षणाधिकारी अजय घाणे, केंद्रप्रमुख उमेश वजराठकर, विज्ञान मंडळ सदस्य तृप्ती देसाई, प्रशालेचे संस्थाध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, भोगवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश सामंत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आदी मान्यवरांसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध वैज्ञानिक प्रतिकृतींची पाहणी करून विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कार्यपद्धतीची व वैज्ञानिक संकल्पनांची माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनातून प्राथमिक विभागातील एक आणि माध्यमिक विभागातील एक अशा दोन प्रतिकृतींची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन महत्त्वाचे आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी महिनाभर मेहनत घेऊन हे प्रदर्शन उभारले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर घडले आहेत. मात्र, भविष्यात या जिल्ह्यातून किमान एक तरी नामवंत शास्त्रज्ञ घडावा, अशी अपेक्षा आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांसारख्या महान शास्त्रज्ञांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता जिज्ञासू वृत्तीने प्रयोग करावेत आणि संशोधनाकडे वळावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान केंद्र उभारण्याची गरज असून, त्यासाठी लोकप्रतिनिधी व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. हे विज्ञान केंद्र वेंगुर्ला येथे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विज्ञान केंद्रामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उपसभापती सचिन देसाई यांनी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे विज्ञान प्रदर्शन आपल्या मतदारसंघात होत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.
विविध स्पर्धांचे आयोजन
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्राथमिक गटातील प्रश्नमंजुषा आणि प्रतिकृती मांडणी स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता प्राथमिक व माध्यमिक गटातील प्रतिकृती परीक्षण, सकाळी १०.३० वाजता माध्यमिक गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहेत. दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभाने या प्रदर्शनाची सांगता होणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








