
कुडाळ : पिंगुळी येथील बांधकाम प्रकल्पाविरोधातील उपोषण आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगतानाच त्यांनी विरोधकांवर या विषयाचे राजकीय भांडवल केल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादी (शप) नेते आमदार जयंत पाटील यांच्यावरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. तसेच आपण ग्रामस्थांसोबत असल्याची ग्वाही दिली. पिंगुळी येथे आज झालेल्या सभेला तहसीलदार, बीडीओ, विस्तार अधिकारी आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. हॉल पूर्ण भरला होता, असे राणे यांनी सांगितले. यापूर्वी ओरोस येथील बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलूनच आपण गावात आल्याचे त्यांनी नमूद केले.
"पिंगुळीवासीयांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही," असे सांगत त्यांनी सांगितले. पाझर तलाव दूषित होऊ दिला जाणार नाही. बिल्डरच्या मंजूर प्लॅनमध्ये पायवाट आधीपासूनच आहे, त्यामुळे ती बिल्डरने खुली करून दिलीच पाहिजे. पाहणीवेळी बिल्डरने रिटेनिंग वॉल बांधून देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे ग्रामस्थ कोणतीही नवी मागणी करत नाहीत असे सांगत निलेश राणे यांनी विरोधकांच्या आरोपांची अक्षरशः खिल्ली उडवली.
प्रकल्पाचा एन.ए. फेब्रुवारी २०२४ मधला
उपोषणाला प्रशासनाला दोष दिला जात असल्याबद्दल राणे यांनी मुद्दा उपस्थित केला. प्रकल्पाचा एन.ए. (अकृषिक परवाना) १७ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला असून, आपण ऑक्टोबर २०२४ मध्ये आमदार झालो. असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही आपण कोणावर आरोप-प्रत्यारोप केले नाहीत, मात्र काहींना या विषयाला राजकीय वळण द्यायचे आहे असे ते म्हणाले. विरोधकांवर "भांडवल" केल्याचा आरोप त्यांनी केला.
उपोषणस्थळी बाहेरून लोक आणले जात असल्याचा दावा करत राणे म्हणाले, "तिकडची गर्दी बघा आणि इकडे किती लोक आहेत ते बघा." कणकवलीतून आलेले जी. जी. उपरकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांचा त्यांनी नामोल्लेख केला. स्थानिक उपोषणकर्त्यांचा आपण आदर करतो, पण काही जणांना लोकांना खरे सांगायचेच नाही, असा आरोप त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत उबाठा गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि संबंधित डेव्हलपर यांचे पूर्वीपासूनचे संबंध असल्याचे आणि निवडणुकीत मदत घेतल्याचे सांगितल्याचेही राणे यांनी नमूद केले. सात-आठ दिवस उपोषण सुरू असताना केवळ राजकीय भांडवलासाठी लोकांना वेठीस धरणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी केला.
"बाहेरचे नेते आणावे लागतात"
यापूर्वी राजू शेट्टी आणि आता जयंत पाटील यांना बोलावले गेल्याचा संदर्भ देत राणे म्हणाले, "यातून स्थानिक माजी आमदारांची किंमत संपली आहे. हेच ते स्वतः सिद्ध करत आहेत." आम्ही सर्व स्थानिक आहोत, तर गावात फूट कोणी पाडली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जिल्ह्याचे वातावरण अस्थिर करून राणे आणि युती सरकारच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कुडाळमधील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या प्रसंगाचा दाखला देत, प्रत्येक कामाला विरोध करण्याची भूमिका विरोधक घेत असल्याचे ते म्हणाले.
जयंत पाटलांवर तीव्र टीका
आमदार जयंत पाटील विधानसभेत हा मुद्दा मांडणार असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणले असता राणे यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. पाटील यांनी सांगलीतील अनेक जमिनी विकल्या आणि स्वतःचा मतदारसंघ दिवाळखोरीत नेला. कोकणासाठी बनवलेल्या ३५-४० कोटी रुपयांच्या काजू बोर्डाच्या सबसिडीचे पैसे खाल्ले.
साखर कारखान्यांच्या नावाखाली सबसिडी घेऊन पश्चिम महाराष्ट्राचे नुकसान केले. अर्थमंत्री असूनही ९० टक्के भाषणे वाचून करतात, तसेच आता आरटीआय ॲक्टिव्हिस्टसारखे महसूल विभागाला दर महिन्याला पत्र लिहून वाळू, चिरा, खडी आदींची माहिती मागतात." त्यांनी विधानसभेत मुद्दा मांडावा. आम्हीही सभागृहात आहोत. त्यांच्या सांगलीच्या मुद्द्यांवरही बोलायला आम्हाला संधी असून आम्ही कमी पडणार नाही आहोत असे सांगत जयंत पाटील यांना एकप्रकारचा इशारा दिला आहे. उलट मी त्यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो," असे राणे म्हणाले. "आमचे हात स्वच्छ आहेत. तुम्ही सुरुवात करा, शेवट मी करतो," असे आव्हानही त्यांनी आमदार जयंत पाटील यांना दिले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








