
कुडाळ : "माझ्या मतदारसंघातील लोकांचे हितच माझ्यासाठी सर्वोच्च असून, या प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल तर माझाही या प्रकल्पाला ठाम विरोधच राहील," अशी स्पष्ट भूमिका आमदार राणे यांनी मांडली आहे. कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथे प्रस्तावित असलेल्या जलविद्युत प्रकल्पावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आंजिवडे येथील जलविद्युत प्रकल्पाबाबत माध्यमांशी संवाद साधताना आमदार निलेश राणे म्हणाले की, हा प्रश्न थेट माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या भविष्याशी आणि हिताशी जोडलेला आहे. त्यामुळे या प्रकरणी मी पूर्णपणे स्थानिक लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.
प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सत्यता जाणून घेण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील, असे सांगताना आमदार राणे म्हणाले, "या जलविद्युत प्रकल्पाबाबत सर्वप्रथम स्थानिक लोकांशी प्रत्यक्ष भेटून बैठक घेतली जाईल. तसेच सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासोबतही विशेष बैठक आयोजित करून या प्रकल्पाची सर्व तांत्रिक व प्रशासकीय माहिती घेतली जाईल."
जनतेच्या भावनांचा आदर करत आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला आणि संबंधित यंत्रणांना ठणकावले आहे. "प्रकल्प कोणाचाही असो किंवा तो कितीही मोठा असो, माझ्या मतदारसंघातील जनतेच्या विरोधात जाऊन कोणतेही काम केले जाणार नाही. जनतेचे हित जपणे हे माझे पहिले कर्तव्य असून, त्यांच्या पाठीशी उभे राहून योग्य तीच पावले उचलली जातील," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








