
देवगड : देवगड शहराच्या विकासाला आणि सौंदर्यीकरणाला आणखी एक नवी दिशा मिळणार आहे. एस.टी. महामंडळाच्या आगाराजवळील महत्त्वाच्या वाय जंक्शनचा कायापालट होणार असून, येथे देवगडची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख जपणारे आकर्षक सर्कल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सिंधुरत्न योजनेतून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून शुक्रवारी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत वाय जंक्शन येथे आकर्षक सर्कल उभारण्यात येणार असून, त्यामध्ये देवगडच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा स्टॅच्यू साकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना देवगडच्या ऐतिहासिक ओळखीची अनुभूती मिळणार आहे. पर्यटन हंगामात तसेच ३० आणि ३१ डिसेंबरच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे जंक्शनच्या सुधारणेमुळे वाहतुकीचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
भूमिपूजनप्रसंगी बोलताना राणे म्हणाले की, देवगडच्या विकासासाठी आपण वारंवार येथे येत असून, केवळ भेट देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येक वेळी एखाद्या विकासकामाचे भूमिपूजन करून जाण्याचा आपला प्रयत्न असतो. गेल्या १२ वर्षांत देवगडकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि प्रलंबित प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे. एकेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. आमदार असताना ज्या कामांसाठी पाठपुरावा केला, त्यातील अनेक कामे पालकमंत्री झाल्यानंतर मार्गी लागत आहेत. देवगडकरांनी सांगितलेली कामे आपण विसरलेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाय जंक्शनची सुधारणा झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होईल. पर्यटन वाढल्याने शहरातील बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देवगडमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगताना राणे यांनी ऐतिहासिक खंदकातील प्रस्तावित गार्डनचाही उल्लेख केला. खंदक गार्डनच्या सुशोभीकरणामुळे पर्यटन वाढण्यास मदत होणार असून, या उद्यानाच्या माध्यमातून किमान ५०० लोकांना रोजगार मिळू शकतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देवगडमध्ये नाट्यगृह, क्रीडांगण, सांस्कृतिक भवन यांसारखे प्रकल्पही साकारले जात आहेत. तसेच कुणकेश्वर परिसरातील ताज समूहाच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून स्थानिक तरुणांना हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात रोजगार मिळावा, यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये नोकरी आणि व्यवसायासाठी जाण्याऐवजी देवगडमध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी स्थानिक तरुणांची अपेक्षा आहे. तरुणांनी एकत्र येऊन स्थानिक रोजगाराचा मुद्दा मांडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. देवगडच्या विकासासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी नागरिकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याऐवजी चांगल्या कामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगताना त्यांनी देवगडमधील मच्छीमारांच्या प्रश्नांचाही उल्लेख केला. जेटीच्या वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पर्यायी स्वतंत्र जेटी उभारण्याकरिता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे पाठपुरावा केला आहे. या कामासाठी सुमारे ५० ते ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.
देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विविध प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना राणे यांनी रत्नागिरी परिसरातील गोवा शिपयार्डच्या विस्तार प्रकल्पाचाही उल्लेख केला. या प्रकल्पाचे काम जानेवारी २०२८ पासून सुरू होण्याची अपेक्षा असून, त्यातून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

देवगडमधील तरुण प्रांजल कुलकर्णी याची फ्लाय दुबई विमान कंपनीत पायलट म्हणून निवड झाल्याचा उल्लेख करत देवगडच्या तरुणांमध्ये मोठी क्षमता असल्याचेही त्यांनी नमूद केले. देवगडचा विकास आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हेच आपले उद्दिष्ट असून, देवगडचा कायापालट केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नागरिकांनी पुढील काळातही विकासकामांसाठी साथ आणि आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन केले.
या भूमिपूजन सोहळ्यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नंदकुमार घाटे, पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठूकरूल, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, इंजिनिअर अभिजित कामत, उल्हास मणचेकर, प्रकाश राणे, महेश ताम्हणकर, सुभाष कुलकर्णी, अजयकुमार सर्वगोड, डॉ. सुनील आठवले, देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उगलमुगले आदी उपस्थित होते.
तसेच सार्वजनिक बांधकाम मंडळ तथा सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल, सार्वजनिक बांधकाम विभाग देवगडचे उपविभागीय अभियंता शैलेश मोरजकर, कनिष्ठ अभियंता अविनाश पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








