उत्सव तोच… स्वरूप बदलले !

कुणकेश्वरात आंबा महोत्सव 2026
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 04, 2026 15:30 PM
views 327  views

देवगड : देवगड तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे ११ मे या दिवशी देवगड हापूसची आरास मंदिरात केली जाते.यावर्षीही उत्सव तोच आहे मात्र त्याला स्वरूप थोडे वेगळे देत आंबा महोत्सव २०२६’ हा १० ते १२ मे याकालावधीत साजरा केला जाणार आहे. 

सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात हा महोत्सव पार पडणार असून, भाविक व पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या पवित्र वातावरणात आंब्याच्या गोड सुवासाने भारलेला हा उत्सव दरवर्षीप्रमाणेच यंदाही भक्ती आणि आनंदाचा संगम घडवणार आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर गाभारा व परिसरात हापूस आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. तसेच विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन व विक्री, आंब्यापासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी, तसेच आंब्याच्या रोपांची विक्री व प्रदर्शन असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव अधिक व्यापक करण्यात आला असून, गावातील आंबा उत्पादकांनी स्वच्छ व दर्जेदार आंब्यांची उपलब्धता करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यावर्षी विशेष म्हणजे, मंदिर परिसरात रविवार दि. १० मे ते मंगळवार दि. १२ मे २०२६ या कालावधीत विविध स्टॉल्स उपलब्ध राहणार आहेत. यासाठी गुरुवार दि. ७ मे २०२६ पर्यंत स्टॉल बुकिंग सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या महोत्सवामुळे कुणकेश्वर परिसरात पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. धार्मिकता, निसर्गसौंदर्य आणि कोकणातील ‘आंबा संस्कृती’ यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी भाविकांनी व पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन याश्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 7700997575 संपर्क करावा.