LIVE UPDATES

नशामुक्ती जनजागृती अभियान ; घोषवाक्य - पोस्टर स्पर्धा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 01, 2026 16:29 PM
views 19  views

सावंतवाडी : केंद्र शासनाच्या नशामुक्ती जनजागृती अभियान अंतर्गत प्राप्त परिपत्रकानुसार राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे १ जुलै २०२६ रोजी घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता १२ वीच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी प्र. प्राचार्या डॉ. सुमेधा नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नशामुक्त समाजाची निर्मिती ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करावी, असे आवाहन करत त्यांनी स्पर्धेसाठी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभारी उपप्राचार्या सविता माळगे, स्पर्धा समिती प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, स्पर्धा समिती सदस्या डॉ. संजना ओटवणेकर, प्रा. ज्योती सावंत, प्रसिद्धी समिती प्रमुख डॉ. अजेय कामत, प्रा. वनिता घोरपडे, प्रा. रणजित राऊळ, प्रा. पवन वनवे, प्रा. रणजित माने, प्रा. राहुल कदम, जोसेफ डिसिल्वा, निलेश कळगुंटकर, माया नाईक, स्पृहा टोपले, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. महाश्वेता कुबल आणि प्रा. केदार म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला सकाळी ९.३० वाजता प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचा प्रभावी संदेश देणारी आकर्षक पोस्टर्स तसेच परिणामकारक घोषवाक्ये सादर केली. स्पर्धेसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत वेळ देण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षण योगेश गावित यांनी केले. त्यांनी पोस्टर व घोषवाक्य या दोन्ही प्रकारांतील उत्कृष्ट सादरीकरणांचे परीक्षण करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर केले. यात प्रथम अथर्व तिवरेकर (इ. १२ वी कला( ब), द्वितीय प्राची परब (इ. १२ वी विज्ञान (ब), तृतीय सानिका गोसावी (इ. १२ वी कला (ब), घोषवाक्य स्पर्धेत प्रथम ओम राऊत (इ.१२ वी कला (क), द्वितीय रिया सावंत (इ. १२ वी वाणिज्य (ड),तृतीय वेदिका पिळणकर (इ.१२ वी वाणिज्य (ड) यांनी पटकाविले. स्पर्धेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून नशामुक्त समाजाचा प्रभावी संदेश दिला. उपस्थित मान्यवरांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच भविष्यातही अशा सामाजिक जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.