
अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय ३१ मार्च २०२८ पर्यंत १० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सभासदांना १३ टक्के लाभांश आणि अर्धा टक्का इन्सेंटिव्ह, महिला बचतगटांना विनातारण कर्जमर्यादा ५ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढविणे तसेच पात्र शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फत कमी व्याजदरात ५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण येथील शरद कृषी भवन येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, ॲड. प्रकाश बोडस, गणपत देसाई, महेश सारंग, समीर सावंत, प्रज्ञा ढवण,सौ नीता राणे, रवींद्र मडगांवकर, विद्याधर परब,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी बँकेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील निर्णयांसह आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील कामगिरीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, बँकेच्या ठेवींमध्ये ६०९.४५ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी ३९४२.५७ कोटींवर पोहोचल्या आहेत. कोकणातील जिल्हा बँकांमध्ये १८.२८ टक्के ठेववाढीसह सिंधुदुर्ग जिल्हा बँक अव्वल ठरली आहे. कर्जवाटपात ४७२.०१ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण कर्जे ३२३३.६४ कोटींवर पोहोचली आहेत.
३१ मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ७१७६.२१ कोटी रुपयांवर पोहोचला असून, प्रथमच ७ हजार कोटींचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. बँकेचा एकूण निधी ६३३.६४ कोटी रुपये झाला असून, ढोबळ नफा १४९.४३ कोटी आणि निव्वळ नफा ५० कोटी रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. बँकेचे ढोबळ एनपीए ३.४५ टक्के असून निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण ११.९२ टक्क्यांवर पोहोचले असून यंदाही बँकेला 'अ' ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे.
दळवी यांनी सांगितले की, विकास संस्थांचे शंभर टक्के संगणकीकरण, डिजिटल बँकिंग, एईपीएस, डोअरस्टेप बँकिंग, ग्रीन चॅनेल काऊंटर तसेच ४४ बँक सखींच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत बँकेकडून विविध प्रशिक्षण, बचतगटांना सहाय्य, कुपोषित बालकांसाठी उपक्रम तसेच इतर सामाजिक कार्यक्रमही राबविले जात आहेत.
बँकेच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला असून, बँकेच्या कामकाजाबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केल्याचे दळवी यांनी सांगितले.










