LIVE UPDATES

विधान परिषद निवडणुकीत सिंधुदुर्गात महायुतीचे पारडे जड

जिल्ह्यात २२३ मतदार; तब्बल १८६ मतदार महायुतीच्या बाजूने
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 02, 2026 20:11 PM
views 23  views

सिंधुदुर्गनगरी :  महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण २२३ मतदारांपैकी १८६ मतदार महायुतीशी संबंधित असल्याने या मतदारसंघात महायुतीचे पारडे स्पष्टपणे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या मतदारसंघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांमध्ये नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २२३ मतदारांपैकी १३९ मतदार भारतीय जनता पक्षाचे, तर ४७ मतदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. अशाप्रकारे महायुतीकडे एकूण १८६ मतांचे संख्याबळ आहे.

दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे २८ मतदार असून सहा अपक्ष आणि एक काँग्रेसचा प्रतिनिधी मतदार आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारावर महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अपक्षांची भूमिका ठरणार निर्णायक

जिल्ह्यातील अपक्ष सदस्यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः जिल्हा परिषदेत भाजपमधील बंडखोरीनंतर निवडून आलेले सहा सदस्य सध्या अपक्ष म्हणून गणले जात आहेत. हे सदस्य मतदानाच्या वेळी कोणत्या बाजूने उभे राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


जिल्हानिहाय मतदारसंख्या

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या संपूर्ण मतदारसंघात एकूण १,०२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६१८ मतदार रत्नागिरी जिल्ह्यात, २२३ मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तर १७९ मतदार रायगड जिल्ह्यात आहेत.


सिंधुदुर्गातील मतदारांचे बलाबल


पक्ष मतदार संख्या


भाजप १३९

शिवसेना (शिंदे) ४७

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना २८

अपक्ष

काँग्रेस

एकूण २२३


राजकीय गणित पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व स्पष्ट दिसत असले तरी अपक्ष सदस्यांची भूमिका आणि मतदानाच्या दिवशी होणारी प्रत्यक्ष मतांची मांडणी यावर अंतिम निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.