
कणकवली : भारतीय राजकारणातील अभ्यासू, तत्वनिष्ठ आणि समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली रेल्वे स्टेशन येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि 'आम्ही कणकवलीकर' या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गेली सलग 21 वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आम्ही कणकवलीकर' सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर यांच्यासह नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. मधू दंडवते यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अशोक करंबेळकर यांनी नानांच्या साधेपणावर प्रकाश टाकला. प्राध्यापक मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे एक ध्यास म्हणून पाहिले होते आणि त्यांनी हा ध्यास आणि कोकणवासी यांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. कोकणाप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा, कोकणातील जनतेशी निर्माण झालेले आत्मीयतेचे नाते आणि त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास याविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कॉम्रेड प्रशांत सावंत यांनी प्रा. मधू दंडवते यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कोकण रेल्वेच्या निर्मितीतील त्यांच्या योगदानाचा, सामान्य रेल्वे प्रवाशांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि कामगार चळवळीशी असलेल्या त्यांच्या नात्याचा आढावा घेतला.नॅशनल रेल्वे मजदूर युनियन चे विभागीय अध्यक्ष कॉम्रेड रमाकांत नाडकर्णी यांनी १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपाच्या आठवणी सांगितल्या. या संपानंतर सेवेतून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत मधू दंडवते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
'आम्ही कणकवलीकर' संस्थेचे सदस्य पत्रकार विजय गांवकर यांनी आपल्या मनोगतात नानांच्या कोकणप्रेमाचा उल्लेख केला. मधू दंडवते यांचा जन्म कोकणात झाला नसला, तरी अहमदनगरहून येऊन त्यांनी कोकणातील प्रत्येक माणसाच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. संसदेत कोकणच्या प्रश्नांसाठी त्यांनी मांडलेले विचार आणि कोकणाच्या विकासाप्रती असलेली त्यांची आस्था याविषयी त्यांनी आपले विचार मांडले.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन चे संघटक सचिव कॉम्रेड संजय खरविले यांनी नानांचे विचार आणि कामगार चळवळीतील त्यांचे योगदान यावर भाष्य केले. याचवेळी कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात मोफत वाचनालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प त्यांनी जाहीर केला. या वाचनालयाचे उद्घाटन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉ वेणू पी नायर यांच्या हस्ते मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कणकवली शाखा सचिव कॉ. प्रशांत तांबे यांनी केले. कार्यक्रमाला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कणकवली शाखाध्यक्ष कॉ. भाऊ चिरेकर, निशा तेरसे, उमेश वाळके, पाटील, गुरव, कांबळे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी व सभासद तसेच कोकण रेल्वेचे कर्मचारी आणि दंडवतेप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








