
बांदा : दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय योजना नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि सामूहिक सहभागातून उभी राहणारी आर्थिक समृद्धीची चळवळ आहे. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून, शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य, व्याजदरात सवलत आणि कर्जपुरवठ्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, बांदा येथे दुधाळ जनावरे खरेदी योजनेअंतर्गत कर्जप्रस्तावांना मंजुरी देऊन शेतकऱ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. बांदा व मडुरा येथील एकूण २५ शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून, प्रत्येक शेतकऱ्याला दोन नवीन दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना बँकेपर्यंत येण्याऐवजी बँकेने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून हा उपक्रम राबविला. यावेळी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे, दुग्ध व्यावसायिक अनिरुद्ध करंदीकर, बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच बांदा आणि मडुरा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मनीष दळवी म्हणाले की, गेल्या दोन ते तीन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादन १५ हजार लिटरवरून ४० ते ५० हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे. ही निश्चितच समाधानकारक प्रगती आहे. मात्र, ही वाढ कायम ठेवण्यासाठी केवळ जनावरांची संख्या वाढवून चालणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, योग्य प्रशिक्षण, जनावरांचे शास्त्रीय संगोपन आणि व्यवसायाचे नियोजन यावरही भर देणे आवश्यक आहे.
दूध उत्पादन वाढविण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करणे, पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून ओला चारा, सुका चारा आणि पशुखाद्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करावी. महागडी यंत्रसामग्री प्रत्येक शेतकऱ्याने स्वतंत्रपणे खरेदी करण्याऐवजी दूध संस्था आणि शेतकरी गटांनी सामूहिकरीत्या खरेदी करून ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी भगीरथ संस्थेचे प्रसाद देवधर यांनी दुग्धव्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास दुग्धव्यवसायातून निश्चितच आर्थिक समृद्धी साधता येईल, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठावे, दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, अशी श्री देव बांदेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करून मनीष दळवी यांनी या दुग्धक्रांतीच्या चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








