
कुडाळ : तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गसमृद्ध वारसा लाभलेले वालावल हे गाव अवघ्या कोकणात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील चौदाव्या शतकातील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिराची ख्याती दूरवर पसरली असून हेमाडपंथी शैलीची वास्तुकला, सुरेख नक्षीकाम आणि या मंदिराच्या बाजूला असलेला शांत व भव्य तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. मात्र, याच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तलावाची आज अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, तलावात अनियंत्रितपणे वाढलेल्या कमळांच्या वेलींमुळे संपूर्ण तलाव दूषित झाला आहे.
तलावाला वेढला कमळांच्या वेलींचा विळखा आणि दुर्गंधी
गेल्या तीन वर्षांत या तलावामध्ये कमळाच्या वेलींची प्रचंड वाढ झाली आहे. या वेलींनी संपूर्ण तलावाला आपल्या वेढ्यात घेतले आहे. दिसायला ही कमळे अत्यंत सुंदर वाटत असली, तरी प्रत्यक्षात त्यांचे हे सुंदर रूप आता मागे पडून, पाण्याला दूषित केल्यामुळे त्यांचे विद्रूप रूप तलावावर स्पष्टपणे दिसू लागले आहे. या वाढलेल्या वेलींमुळे तलावातील पाण्याचा कडवटपणा वाढला असून पाण्याला तीव्र दुर्गंधी सुटली आहे.
एके काळी ज्या तलावाच्या पाण्याचा वापर पवित्र तीर्थस्वरूपात व धार्मिक कार्यासाठी केला जात होता, आज त्याच पाण्याची स्थिती अत्यंत खालावल्यामुळे ते तीर्थ म्हणून वापरणे तर दूरच, साध्या वापरासाठीही अयोग्य ठरत असल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर समस्येबाबत गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने देऊन मागणी केली होती, परंतु प्रशासनाकडून याकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले. एकीकडे पाण्याचे स्रोत टिकवणे व त्यांचे जतन करणे ही काळाची गरज असताना, प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार पाहून "दुष्काळजन्य परिस्थितीच्या काळात पाण्याचे स्रोत सांभाळण्याकडे प्रशासनाचे का डोळेझाक सुरू आहे?" असा सवाल जनता विचारत आहे. प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने अखेर 'गाव ते राव काय करी' या न्यायाने ग्रामस्थांनी स्वतःच हातात सूत्रे घेतली आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून दररोज दुपारी तीननंतर गावातील महिला, वृद्ध, तरुण असे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तलाव स्वच्छता मोहीम राबवत आहेत. पारंपरिक साधनांचा वापर करून एकजुटीने ही कमळे मुळासकट काढण्याचे कठीण प्रयत्न सुरू आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून किती दिवस लागतील याचा नेमका ठावठिकाणा नसला, तरी गावकऱ्यांचा उत्साह आणि जिद्द कमी झालेली नाही.
"सुंदर दिसणारी प्रत्येकच गोष्ट लाभदायी असतेच असे नाही," याचे हे एक ज्वलंत उदाहरण वालावलमध्ये पाहायला मिळत आहे. सुंदर दिसणाऱ्या कमळांची विद्रुपता या पाण्याच्या दूषितिकरणामुळे अधिक त्रासदायक झाली आहे. ७०० वर्षांच्या प्राचीन परंपरेचा वारसा सांगणाऱ्या या ऐतिहासिक मंदिराच्या परिसरातील जलस्त्रोत वाचवण्यासाठी आता ग्रामस्थ एकजुटीने लढत आहेत. या जनआंदोलनाची दखल घेऊन प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आणि या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढे काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








