
लांजा : पावसाळी पर्यटनासाठी हक्काचे ठिकाण बनलेल्या लांजा तालुक्यातील माचाळ येथील उलटा धबधबा (रिव्हर्स फॉल) पर्यटकांच्या आकर्षणाचा मोठा केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र, या परिसरातील खोल दरी आणि दाट धुके लक्षात घेता, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तातडीने लोखंडी संरक्षक कठडा उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
समुद्रसपाटीपासून साधारणपणे साडेतीन हजार फूट उंचीवर माचाळ गाव वसले आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या माचाळगावचे नैसर्गिक सौंदर्य हे पावसाळ्यात अधिक खुलते. छोटे छोटे धबधबे , दूरवर पसरलेली दाट धूक्याची चादर त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये या गावाला लांजा तालुक्यासह रत्नागिरी, मुंबई ,कोल्हापूर ,सिंधुदुर्ग येथून पर्यटक भेट देत असतात. येथील नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत असतात.
माचाळ येथील आणखी एक आकर्षण ठरते ते म्हणजे रिव्हर्स फॉल अर्थात उलटा धबधबा होय. अंगाला झोंबणारा थंडगार वारा, दाट धुके, डोळ्यात मावणार नाही इतकी खोल दरी यामुळे येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. विशेषतः शनिवार-रविवारी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हजारो पर्यटक या धबधब्याला आवर्जून भेट देतात आणि अंगावर धबधब्याचे तुषार झेलण्याचा आनंद अनुभवतात. डोळ्याचे पारणे फेडणारे येथील नैसर्गिक सौंदर्य मनाला भुरळ पाडते. त्यामुळे आपसूकच सेल्फी किंवा फोटो घेण्याचा पर्यटकांना अनावर होतो.
या उलट्या धबधब्याच्या ठिकाणी एका बाजूला खोल अशी दरी असल्याने चुकून एखाद्याचा तोल गेला, किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाय घसरला तरी क्षणात आनंदावर विरजण पडू शकते. म्हणूनच ही बाब लक्षात घेऊन उलटा धबधबा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने लोखंडी संरक्षक कठडा उभारण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक बनले आहे.











