LIVE UPDATES

'क्लास १' अधिकारी घडण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे सकारात्मक पाऊल

मुंबई येथे प्र-कुलगुरूंची भेट घेत निवेदन सादर : मुंबई विद्यापीठाचे 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' सुरू करण्याची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 01:52 PM
views 19  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी आणि इतर केंद्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि कुडाळमधून भविष्यातील 'क्लास १' अधिकारी घडावेत, या उद्देशाने युवासेना जिल्हाप्रमुख व माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी एक महत्त्वाचे व सकारात्मक पाऊल उचलले आहे. या भेटीदरम्यान संदीप म्हाडेश्वर, साई शिंदे आणि सागर तळेकर आदी उपस्थित होते.

कुडाळ येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सुसज्ज 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई येथे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम हे देखील उपस्थित होते.

निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी संपूर्ण राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल अव्वल लागतो. येथील विद्यार्थी अत्यंत हुशार व कष्टाळू असूनही, ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शन, आधुनिक ग्रंथालय आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने ते स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहतात. आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे क्लासेस लावणे शक्य होत नाही.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी आणि त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी यापूर्वी देखील मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून दोन विशेष मार्गदर्शन चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. आता कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि प्रमुख शैक्षणिक ठिकाण असल्याने येथे कायमस्वरूपी केंद्र सुरू झाल्यास जिल्ह्यातील हजारो गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळेल आणि प्रशासकीय सेवेत 'क्लास १' सारख्या उच्च पदांवर जाण्याची संधी उपलब्ध होईल.

या मागणीचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता प्र-कुलगुरू अजय भामरे यांनी या निवेदनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. 


ताजी बातमी

View all

Khed Zilla Parishad Primary School in Chiplun reopens with 23 students
Chiplun News : बिल्डरच्या ताब्यात जाणारी खेंडची जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू
November 21, 2026
Chiplun Municipal Council announces revised water supply timings amid water shortage concerns
Chiplun Water Supply : चिपळुणात आता दिवसातून एकदाच पाणीपुरवठा
November 21, 2026
नीरजा पवारची बॅडमिंटन राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण झेप
November 21, 2026
तेंडोली येथे २४ नोव्हेंबर रोजी श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव
November 21, 2026
संबंधित बातम्या

View all

Khed Zilla Parishad Primary School in Chiplun reopens with 23 students
Chiplun News : बिल्डरच्या ताब्यात जाणारी खेंडची जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू
November 21, 2026
Chiplun Municipal Council announces revised water supply timings amid water shortage concerns
Chiplun Water Supply : चिपळुणात आता दिवसातून एकदाच पाणीपुरवठा
November 21, 2026
तेंडोली येथे २४ नोव्हेंबर रोजी श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव
November 21, 2026
कुडाळमध्ये लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन
November 21, 2026