LIVE UPDATES

Chiplun Water Supply : चिपळुणात आता दिवसातून एकदाच पाणीपुरवठा

२ तासांऐवजी दीड तासच पाणी मिळणार; २३ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 01:46 PM
views 19  views
Chiplun Municipal Council announces revised water supply timings amid water shortage concerns

चिपळूण : अल्प प्रमाणात झालेला पाऊस आणि दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन चिपळूण नगरपरिषदेने आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी २३ नोव्हेंबरपासून शहरात दिवसातून दोन वेळा प्रत्येकी एक तास होणारा पाणीपुरवठा बंद करून आता दिवसातून एकदाच एक तास ३० मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

चिपळूण नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना या निर्णयाची माहिती देण्यासाठी नगरपरिषदेने जाहीर आवाहन प्रसिद्ध केले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन व्हावे आणि भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई टाळता यावी, यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

विशेषतः गोवळकोट रोड, पेठमाप व उक्ताड या भागांना खेडी दत्त मंदिर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या भागांसह नगरपरिषद हद्दीतील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य नियोजन करून वापर करण्याचे आवाहन केले आहे. पाणीटंचाईचे संभाव्य संकट टाळण्यासाठी नगरपालिकेच्या उपाययोजनांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि मुख्याधिकारी संजय जाधव  यांनी केली आहे.