
कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आणि लायन्स सेवा संकुल कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर २९, ३० व ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत लायन्स फेस्टिव्हल अर्थात लायन्स ऑटो एक्स्पो, इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात ऑटो एक्स्पो, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, औद्योगिक वस्तूंचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. सिंधुदुर्गसह पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी भागांतून ८५ हून अधिक स्टॉल्स सहभागी होणार असल्याची माहिती लायन्स सेवा संकुलचे अध्यक्ष ॲड. अमोल सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ॲड. अमोल सामंत, ॲड. अजित भणगे, सीए सुनील सौदागर, ॲड. श्रीनिवास नाईक, सीए सागर तेली, लायन्स क्लबच्या अध्यक्ष स्नेहा नाईक, आनंद कर्पे, डॉ. अमोघ चुबे, ॲड. शेखर वैद्य आदी उपस्थित होते.
ॲड. सामंत म्हणाले, सन १९९८ पासून लायन्स महोत्सवाची परंपरा सुरू झाली. गोवा राज्यात अशा प्रकारचे महोत्सव आयोजित केले जात होते. त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असा महोत्सव व्हावा आणि स्थानिक व्यवसाय, उद्योग व पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने लायन्सने इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलची सुरुवात केली. त्यानंतर लायन्स क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांनीही संयुक्तपणे महोत्सवाचे आयोजन केले. एक वर्षाआड लायन्स आणि रोटरी क्लबकडून महोत्सव आयोजित करण्याची परंपरा सुरू झाली. यंदा लायन्स क्लबकडून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत महोत्सव सुरू राहणार आहे. यामध्ये ऑटो एक्स्पो, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्ह्यातील पर्यटन आणि व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. या महोत्सवाला आमदार निलेश राणे यांचेही सहकार्य लाभणार आहे. महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून लायन्स पदाधिकारी गणेश म्हाडदळकर काम पाहत आहेत.
ॲड. अजित भणगे यांनी सांगितले की, महोत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी जिल्ह्याबाहेरील कलाकारांचे, तर दुसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककलांना आणि कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सीए सागर तेली म्हणाले, महोत्सवाचा दर्जा आणि वेगळेपण जपण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. विविध प्रकारच्या स्टॉल्समुळे नागरिकांना खरेदी आणि खाद्यसंस्कृतीचा आनंद घेता येणार आहे. स्थानिक कलाकारांसोबतच बाहेरील दर्जेदार कलाकारांचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. कुडाळमधील उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत असल्याने हा महोत्सव यशस्वी होत आहे.
ॲड. शेखर वैद्य यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि अन्य भागांतून ८५ हून अधिक स्टॉल्स सहभागी होणार आहेत. आतापर्यंत जवळपास ६० टक्के स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले असून, उर्वरित स्टॉल्ससाठीही प्रतिसाद मिळत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








