LIVE UPDATES

तेंडोली येथे २४ नोव्हेंबर रोजी श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 01:30 PM
views 30  views

कुडाळ : तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जत्रोत्सवानिमित्त पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागणार असून ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे तसेच केळी व नारळ अर्पण करण्याचे विधी पार पडतील. सायंकाळी पाषाणे सजविण्यात येतील आणि तरंगरुप देवतांना वस्त्रालंकार अर्पण करून श्रीफळ ठेवत गाऱ्हाणे घातले जाईल.

रात्री ८ वाजता टिपर (पणत्या) लावण्यात येतील, तर रात्री ९ वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. त्यानंतर रात्री ११ वाजता सुप्रसिद्ध मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक सादर केले जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी दहिकाल्याच्या कार्यक्रमाने जत्रोत्सवाची सांगता होईल.

या वार्षिक जत्रोत्सवाचा सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती (तेंडोली) आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.