LIVE UPDATES

देवगड महाविद्यालयात २७ नोव्हेंबरला ‘गांधी विचार संस्कार परीक्षा २०२६’

विद्यार्थ्यांना महात्मा गांधींचे विचार, जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान समजून घेण्याची संधी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 11:28 AM
views 35  views

देवगड : शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवगड येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ‘गांधी विचार संस्कार परीक्षा २०२६’ शुक्रवारी २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधी यांचे विचार, जीवनकार्य, सत्य, अहिंसा, स्वावलंबन, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची रुजवण व्हावी, हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे.

गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या माध्यमातून दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानेही या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गांधीजींच्या विचारांचा परिचय करून देण्याबाबत प्रोत्साहन दिले आहे. या परीक्षेसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विविध स्तरांवर ही परीक्षा आयोजित केली जाते.

या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग, त्यांचे विचार, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, ग्रामस्वराज्य, स्वच्छता, शिक्षण, रचनात्मक कार्यक्रम आणि सामाजिक परिवर्तन यांची माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, वैचारिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची जोपासना होण्यासही या परीक्षेची मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना गांधीजींच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमूल्यांची ओळख करून घेण्यासाठी ही परीक्षा एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. शिक्षण विकास मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.