LIVE UPDATES

आनंदी जीवनासाठी सत्संग आणि साधनेत सातत्य आवश्यक

भास्कर काजरेकर यांचे प्रतिपादन : आंदुर्ले येथे सनातन संस्थेचे प्रवचन संपन्न
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 01:08 PM
views 18  views

आदुर्ले : मानवी जीवनात खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त करायचा असेल, तर केवळ भौतिक सुखांच्या मागे न लागता सतत सत्संगात राहून साधनेत सातत्य राखणे आवश्यक आहे. नामसाधना, सत्संग आणि कुलदेवतेचा नामजप यांच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती साधता येते. माणसाच्या जीवनातील दुःखांची आध्यात्मिक कारणे ओळखून त्यावर साधनेच्या माध्यमातून उपाय करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सनातनचे साधक भास्कर विठ्ठल काजरेकर यांनी केले.

आंदुर्ले ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. काजरेकर म्हणाले की, मनुष्यजन्म हा प्रारब्धाचे भोग भोगून त्यातून मुक्त होण्यासाठी आणि अंतिमतः ईश्वरप्राप्ती साध्य करण्यासाठी मिळालेला आहे. मानवी जीवनातील सुमारे 80 टक्के दुःखांची कारणे ही आध्यात्मिक असतात. त्यामुळे आपल्या जीवनातील दुःखांचे मूळ कारण समजून घेणे आवश्यक आहे. कलियुगात आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी नामसाधना हा प्रभावी मार्ग आहे. विशेषतः पूर्वजांच्या त्रासांपासून मुक्तीसाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणे आवश्यक आहे.

पुढे ते म्हणाले की, जशी आई आपल्या मुलाच्या सर्वाधिक जवळ असते, त्याचप्रमाणे कुलदेवता ही साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाची असते. कुलदेवतेच्या उपासनेमुळे साधकाची आध्यात्मिक प्रगती होऊन त्याला गुरुप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करता येते. त्यामुळे दररोज श्री गुरुदेव दत्त या नामजपाबरोबरच आपल्या कुलदेवतेचा नामजप करणेही आवश्यक आहे. नामजप आणि सत्संग यामध्ये केवळ काही दिवस उत्साहाने सहभागी होऊन चालत नाही, तर त्यात सातत्य राखणे अधिक महत्त्वाचे आहे. नियमित साधनेमुळे जीवनात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रवचनाला आंदुर्ले गावचे सरपंच अक्षय तेंडोलकर, जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील, उपसरपंच अनिल भगत, महिला बचतगट प्रमुख यांच्यासह सुमारे 75  जिज्ञासू उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच अक्षय तेंडोलकर यांच्या हस्ते प्रवचनाचे वक्ते भास्कर काजरेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रवचनानंतर उपस्थित जिज्ञासूंच्या मनातील विविध प्रश्नांचे शंकानिरसन करण्यात आले. यावेळी वामन परब यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले.