LIVE UPDATES

Konkan Marathi Sahitya Sammelan 2026 : दुष्काळामुळे कोमसापचे १८ वे साहित्य संमेलन तात्पुरते पुढे ढकलले

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 06:37 PM
views 75  views

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे होणारे १८ वे साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण मुंबई किंवा ठाण्यात करण्यात येणार असल्याची माहिती कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सौ. कीर म्हणाल्या की, कोमसापचे विश्वस्त आणि राज्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याशी काल झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत होती. परंतु दुष्काळामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्याशी चर्चा करून लवकरच जाहीर करण्यात येईल.

सौ. कीर म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं वातावरण आहे. १९७२ नंतर हा आलेला दुष्काळ आहे. कोकणातही तीव्रता भीषण आहे. राज्यातील जवळपास ४०० हून अधिक तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असून त्यात वाढ होत आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये तीव्रता खूप आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, चारा नाहीये, अन्नपाण्याची टंचाई भासू लागली आहे. अशा परिस्थितीत कोमसापने संवेदनशील निर्णय घेत संमेलन पुढे ढकलण्याचे ठरवले आहे. अशा परिस्थितीमध्ये संमेलन घेणं हे संयुक्तिक नाही. परिस्थिती निवळल्यानंतर हे संमेलन घेण्यात येईल.

पत्रकार परिषदेला कोमसापचे कार्यवाह माधव अंकलगे, १८ व्या संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, युवा समितीचे अरुण मोर्ये, जिल्हा सचिव मुश्ताक खान आदी उपस्थित होते.