
देवगड : मिठमुंबरी-बागवाडी येथे घडलेल्या घटनेप्रकरणी तक्रार करूनही संबंधित व्यक्तींविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत येत्या ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगड पोलीस ठाण्यासमोर ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबत मिठमुंबरी-बागवाडी येथील राजाराम हरी आडकर व पारंपरिक ग्रामस्थांनी देवगड पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मिठमुंबरी-बागवाडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर २७ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार केली होती. तसेच ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी पोलीस प्रशासनाने दोन दिवसांची मुदत मागून याबाबत निर्णय घेऊन कळविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही मुदत संपूनही प्रशासनाकडून कोणताही निर्णय कळविण्यात आलेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांना त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तींनी दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असतानाही त्यांच्याविरोधात अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याने कारवाईला टाळाटाळ होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
वारंवार तक्रारी करून, तसेच पोलीस प्रशासनाशी प्रत्यक्ष चर्चा करूनही न्याय मिळत नसल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगड पोलीस ठाण्यासमोर होणाऱ्या या ‘जेल भरो’ आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही निवेदनातून करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








