LIVE UPDATES

कुडाळ सांगिर्डेवाडी येथील कचरा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

जेसीबीने खड्डा मारून रस्ता केला बंद
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 05, 2026 20:11 PM
views 114  views

कुडाळ : कुडाळ पिंगुळी आणि लगतच्या भागात कचरा डम्पिंग ग्राउंडमुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कचरा डेपोमुळे नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांचा पाढा वाचत सांगिर्डेवाडीतील संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदून कचरा डम्पिंग ग्राउंडचा मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा ठाम निर्धार अंमलात आणला.

श्री देव वरंडेश्वर मंदिरामध्ये या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्व जनतेला एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बैठकीत कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत बोलताना ग्रामस्थांनी व्यथा मांडली की, "कचऱ्यामुळे परिसरात भटके कुत्रे, कावळे आणि बगळ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. हे प्राणी कचऱ्यातील कोंबड्यांची हाडे, पिसे आणि इतर घाण आजूबाजूला पसरवत आहेत. विशेषतः पावसाळ्यात या कचऱ्याची तीव्र दुर्गंधी सुटत असून आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. नगरपंचायतीला यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही.

या वेळी के. बी. परब यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, "माणूस म्हणून जगताना या प्रचंड समस्या आम्हाला सहन कराव्या लागत आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही समस्या पूर्णपणे हटवण्याची विनंती करूया.

नगरपंचायतीच्या कारभारावर ताशेरे ओढताना विनायक राणे यांनी सांगितले की, "सदर जागेचे मालक साखळकर असून त्यांनी ५ वर्षांसाठी ही जागा कचरा डम्पिंगसाठी दिली आहे. मात्र, याचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नाही, त्यामुळे पाच वर्षानंतर कचरा टिकणे या प्रकरणी नगरपंचायतच मुख्य दोषी आहे."नगरपंचायतने इतरत्र कचरा डम्पिंग साठी आपली सोय करणे गरजेचे होते. तसेच अमित सामंत यांनी आक्रमक इशारा देत, "साखळकर यांनी जर यात वैयक्तिक स्वार्थ साध्य करण्याचा हेतू ठेवला असेल, तर त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा," अशी मागणी केली.

सरकारकडून प्राप्त झालेल्या अधिकृत कचरा डम्पिंग ग्राउंडवरच नगरपंचायतीने कचरा टाकायला हवा. मात्र, येथे सर्व प्रकारचा कचरा एकत्रितपणे (डम्प) टाकला जात असल्याने तो नष्ट होणे शक्य होत नाही. या समस्येवर तोडगा निघत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंडकडे जाणारा रस्ता बंद करण्याचा निर्धार केला. त्यानुसार सायंकाळी थेट जेसीबी बोलावून रस्त्याला चर (खड्डा) मारून कचरा वाहनांचा मार्ग पूर्णपणे रोखण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला विनायक राणे, अभय शिरसाट, अमित सामंत, धीरज परब, अमित राणे, बाळ कन्याळकर, डॉ. अभय सावंत, मकरंद परुळेकर, मंदार शिरसाठ, मुक्ती परब, संदीप महाडेश्वर, गुरु गडकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.