LIVE UPDATES

महिला व बालकल्याण समितीतर्फे महिला सक्षमीकरण प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ

महिलांनी आत्मनिर्भर बनत स्वसंरक्षण केले पाहिजे : नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 18:33 PM
views 19  views

सावंतवाडी : युवती व महिलांनी आत्मनिर्भर बनत स्वसंरक्षण केले पाहिजे. त्यासाठी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीने हे विशेष प्रशिक्षण सुरू केले आहे. शहरातील महिला व युवतींचे सक्षमीकरण प्रशिक्षण घेऊन एक महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब सक्षम होईल, अस मत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रध्दाराजे सावंत-भोसले यांनी व्यक्त केल. तसेच राजघराण्यातील राण्यांनी सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळ उभारत हस्तकलेचे वैभव जपून ठेवल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित युवती व महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणावर आधारित व्यवसायिक, तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्षा श्रध्दाराजे सावंत-भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, नगरसेविका स्नेहा नाईक, 'जागृती' संस्थेचे संदीप पवार, शारदा पाटील, श्रीमती मुल्ला, गजानन परब, परवीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा म्हणाल्या, महिलांना सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आपल्या राजघराण्यातील श्रीमंत पार्वतीदेवी भोसले यांच्यासह राजे आणि राण्यांनी संस्कृती, संस्कृतीचे विविधांगी वैभव, हस्तकला, लाकडी खेळणी, मोती तलाव आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शहराला सुंदर बनवण्याचे काम केले. महिलांनी सक्षमपणे उभे राहून आपण समाजाचे जबाबदार व सक्षम नागरिक आहोत हे सिद्ध करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले. 

दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली भालेकर म्हणाल्या, सावंतवाडी शहरातील महिलांना काहीतरी नवीन आणि उपयुक्त शिकायला मिळावे या उद्देशाने १८ ते ४५ वयोगटातील महिला व युवतींसाठी दुचाकी व चारचाकी वाहन चालवणे, कॅटरिंग-कुकिंग, फॅशन डिझायनिंग, ज्युदो-कराटे आणि संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणामुळे महिला स्वावलंबी बनतील. वाहन चालवण्यामुळे महिलांमध्ये गतिशीलता येईल, ज्युदो-कराटेमुळे आत्मसंरक्षण होईल आणि संगणक प्रशिक्षणाने डिजिटल युगात पुढे जाण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागृती समाज प्रबोधन संस्था', कोल्हापूरचे संदीप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नगराध्यक्षा श्रध्दाराजे सावंत-भोसले आणि सभापती दिपाली भालेकर यांच्या पुढाकाराने व नियोजनामुळे सावंतवाडीतील महिलांसाठी हा उपक्रम यशस्वीपणे साकारत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषद कृषी अधिकारी गजानन परब यांनी केले, तर आभार जागृती संस्थेचे संदीप पवार यांनी मानले.