
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात आर्थिक घोटाळ्याचे आरोप होत असताना पालिकेकडून तक्रार दिल्यानंतर रजिस्टर गहाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्या जोडाऱ्याकडून आत्महत्येचा इशारा देणारा व्हिडिओ करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून पाणी पुरवठा विभागातील घोटाळ्याच पाणी सध्या पेटल आहे.
पाणीपुरवठा विभागातील जोडारी भारत लाखे फरार असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाणीपुरवठा सभापतीवरच त्याने गंभीर आरोप केलेत. तसेच आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सावंतवाडीत मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात देखील याचे मोठे पडसाद उमटत असून येणाऱ्या स्थायी समिती बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
फरार जोडाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू
दरम्यान, याबाबत सावंतवाडी पोलिसांना विचारल असता रजिस्टर गहाळ झाल्याच्या तक्रारीनंतर संबंधित जोडारी यांनी गायब न होता आपली बाजू आमच्यापाशी मांडण आवश्यक होतं. आजही ते आपली भूमिका पोलिसांकडे येऊन मांडू शकतात. त्यांचीबाजू योग्य असल्यास पोलिसांकडून कोणताही अन्याय त्यांच्यावर होणार नाही. तसेच सध्या ते फरार असून पोलिसांकडूनही त्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.










