LIVE UPDATES

विजघर चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर कारवाई

दोडामार्ग पोलिसांची कारवाई : ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 17:37 PM
views 49  views

दोडामार्ग : गोव्यातून दोडामार्ग मार्गे घाट माथ्यावर होणाऱ्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली. विजघर चेकपोस्ट येथे केलेल्या कारवाईत ५ लाख २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून दोडामार्ग मार्गे घाट माथ्यावर एक आयचर टेम्पो बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू वाहतूक करीत होता. यावेळी हा टेम्पो विजघर चेक पोस्ट येथे आला असता दोडामार्ग पोलिसांना टेम्पो चालकावर संशय आल्याने त्यांनी टेम्पोची तपासणी केली. यावेळी टेम्पोच्या केबिनमध्ये कोपऱ्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांना समजताच त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस हवालदार सुमित चव्हाण, अभिजित कांबळे, रामचंद्र साटेलकर यांनी ही कारवाई केली. 

यावेळी तपासणीत गोवा बनावटीच्या दारूच्या २५ हजार ८०० रुपयांच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच वाहतूक करणारा जीए. 06. टी 6510 क्रमांकाचा आयषर टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊन एकूण 5 लाख 25 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.