LIVE UPDATES

sea turtle nesting : हंगामापूर्वीच कोकणात सागरी कासवांच्या विणीला सुरुवात

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले पहिले घरटे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 14, 2026 12:26 PM
views 53  views
Olive Ridley sea turtle nest protected at Guhagar beach in Ratnagiri

गुहागर : कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीचा हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा दोन महिने आधीच सुरू झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर या हंगामातील पहिले घरटे आढळून आले आहे. 

साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सुरू होणारा हा वीण काळ गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालावधीत केंद्रित झाल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच पहिले घरटे सापडल्याने सागरी पर्यावरणातील बदलांचे हे संकेत आहेत का, याकडे आता पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. (Guhagar sea turtle nesting season)

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादी कासवांचे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आगमन होते. वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडील नोंदीनुसार रायगडमधील चार, सिंधुदुर्गातील सुमारे वीस आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे तीस किनाऱ्यांवर ही वीण प्रक्रिया चालते.

यामध्ये गुहागरचा सहा किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण किनारा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक घरट्यांची नोंद होणारा किनारा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी तब्बल १४५ घरट्यांची नोंद झालेल्या याच ऐतिहासिक किनाऱ्यावर यंदाच्या मोसमातील पहिल्या घरट्याची यशस्वी नोंद झाली आहे.

किनाऱ्यावर भरती रेषेच्या सुरक्षित अंतरावर हे घरटे आढळल्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासातच त्याचे ‘इन-सिटू’ पद्धतीने संवर्धन केले असल्याची माहिती कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी दिली.

सागरी कासवांच्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींमध्ये ‘इन-सिटू’ म्हणजे अंडी मूळ जागेवरून न हलवता नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या घरट्याभोवती जाळीचे मजबूत कुंपण उभारणे होय. यामुळे कोल्हे, कुत्रे आणि इतर भटक्या प्राण्यांपासून अंड्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहतो.

गुहागरच्या किनाऱ्यावर तत्परतेने जाळीचे कुंपण घालून हे घरटे सुरक्षित करण्यात आले असून यामुळे यंदाच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सागरी कासव संवर्धन मोहिमेला औपचारिक आणि उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे.