
खारेपाटण : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून झुंजार मित्र मंडळ, खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आधार कार्ड व महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी होणारी धावपळ कमी व्हावी आणि आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मंडळाने या शिबिराचे नियोजन झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत शेटये व त्यांच्या सहकार्याने केले होते
दि. १३ व १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून आधार कार्ड काढणे, आधार कार्डमधील आवश्यक दुरुस्ती तसेच महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना अनेकदा वेळ आणि पैसा खर्च करून विविध ठिकाणी जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन झुंजार मित्र मंडळाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे महिला शेतकरी तसेच इतर ग्रामस्थांना मोठा लाभ होत असून, शिबिराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्याचा झुंजार मित्र मंडळाचा हा प्रयत्न ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरत आहे.











