
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील खासकीलवाडा परिसरातील चार विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. जिल्हा वार्षिक नियोजनातून मंजूर झालेल्या या कामांसाठी सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब आणि नगरसेविका सौ. स्नेहा नाईक यांनी विशेष प्रयत्न केले.
या विकासकामांमुळे परिसरातील रस्ते, गटार व्यवस्था, संरक्षक भिंत बांधणे या कामांना चालना मिळणार असून स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये खासकीलवाडा येथील नारायण पुंडलिक नाईक यांच्या घरापासून अथर्व अपार्टमेंटपर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे व संरक्षक भिंत बांधणे, रॉड्रिक्स घर ते कोठावळे घर या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, खासकीलवाडा वारंग पाणंद येथे संरक्षक भिंत व गटार बांधकाम,निखिल गावडे यांच्या घरापासून शिल्पग्रामपर्यंत गटार बांधकाम या कामांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब, नगरसेविका स्नेहा नाईक,माजी नगरसेवक श्री. उमा वारंग, सुनील नाईक हितेन नाईक,नीलम कुमठेकर तसेच खासकीलवाडा प्रभागातील सर्व रहिवासी उपस्थित होते. या विकासकामांमुळे परिसरातील मूलभूत नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.











