
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तब्बल आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी प्रश्नाला अखेर मार्ग मोकळा झाला असून, १२ वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या १७९ प्राथमिक शिक्षकांना या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तसेच केंद्र प्रमुख समायोजन प्रक्रिया पूर्ण करून ६९ केंद्र प्रमुखांना पदोन्नती देण्यात आली असून, आणखी ६९ पदोन्नती प्रस्तावांवरही लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीचा विषय गेली आठ वर्षे प्रलंबित असल्याने पात्र शिक्षकांना लाभापासून वंचित राहावे लागले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा करून अखेर १२ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या १७९ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील केंद्र प्रमुख समायोजन प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून, ६९ केंद्र प्रमुखांना पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय आणखी ६९ केंद्र प्रमुख पदोन्नतीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यावरही लवकरात लवकर निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे खेबुडकर यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांशी संबंधित प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने निकाली काढण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा भर असून, विविध सेवा विषयक प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.











