
कुडाळ : कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या निधीच्या घोषणेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शहरातील वाढते अतिक्रमण आणि गंभीर वाहतूक कोंडीचा प्रश्न चर्चेत आला.
कुडाळ शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणासाठी आमदार नीलेश राणे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीद्वारे प्रत्येक वॉर्डातील विकासकामांना वेग दिला जाणार असून, प्रमुख कामांमध्ये नाबरवाडी आणि कवीलकट्टा येथील पाणी समस्येवर मात करण्यासाठी नवीन विहिरींची निर्मिती, भटक्या गुरांच्या सुरक्षित बंदोबस्तासाठी गोशाळेकरिता १५ लाखांची विशेष तरतूद, शहराच्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच कुडाळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण, नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी नाना-नानी पार्कची उभारणी अशा विकास कामांचा समावेश आहे.
याशिवाय, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळातून (DPC) आणखी अतिरिक्त निधी उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.वाहतूक कोंडीच्या समस्येवर बोलताना संबंधित रस्ते हे MIDC आणि PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग) च्या अखत्यारीत येत असून, त्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी व्यक्त केली.
स्थानिक व्यावसायिक तसेच नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ न देता, जागेचे सुयोग्य नियोजन करून लवकरच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी दिली.












