
कुडाळ: कुडाळ-बाव मुख्य मार्गावरील आंबेडकरनगर, दत्तनगर आणि कविलकट्टा परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, येथे पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून, नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदन देण्यात आले आहे. तसेच पुढील ७ दिवसांत खड्डे न बुजविल्यास तीव्र 'रस्ता रोको' आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, या काळात रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांची आणि नागरिकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढणार असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंबेडकरनगर, दत्तनगर आणि कविलकट्टा परिसरात रस्त्यावर प्रचंड मोठे आणि खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी येथे रोज लहान-मोठे अपघात होत आहेत. दुचाकीस्वार, शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे.
वारंवार तक्रारी करूनही PWD विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. पुढील ७ दिवसांत खड्डे दर्जेदार पद्धतीने न बुजविल्यास तीव्र रस्ता रोको आंदोलन केले जाईल.
शिष्टमंडळाची उपस्थिती
या निवेदनावेळी आणि आंदोलनाच्या पवित्र्यात उपजिल्हाप्रमुख अमर सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक मंदार शिरसाठ, नगरसेवक संतोष शिरसाठ, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, बाळा पावसकर, अमित राणे, भूषण कुडाळकर, गुरु गडकर, संजय मसुरकर, धीरेंद्र चव्हाण, तसेच अभियंता श्री. बामणे यांच्यासह आंबेडकरनगर व कविलकट्टा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










